Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये बेकायदेशीर जाहिराती; मराठी अस्मितेचा मुद्दा तापला

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये बेकायदेशीर जाहिराती; मराठी अस्मितेचा मुद्दा तापला

मुंबई लोकल रेल्वेमधील बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Published on

मुंबई लोकल रेल्वेमधील बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी बाबा बंगालीच्या जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झळकल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या प्रकरणावरून रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. हे प्रकरण निवळते न निवळते, तोच आता थेट भोजपुरी चित्रपटांसाठी कलाकारांच्या ऑडिशनच्या जाहिराती मुंबई लोकल ट्रेनमध्ये लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

लोकल ट्रेनमधील दरवाज्याजवळ, खिडक्यांवर आणि डब्यांच्या आतील भागात या जाहिराती लावण्यात आल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जाहिराती पूर्णपणे हिंदी आणि भोजपुरी भाषेत असून, त्यामध्ये मुंबईत ऑडिशन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बाब समोर येताच, मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सध्या बिहार भवनाचा प्रश्न, मराठी-हिंदी भाषिक वाद आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा आधीच तापलेला असताना, लोकल ट्रेनमधील अशा जाहिरातींमुळे वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई ही सर्वांची आहे, मात्र स्थानिक संस्कृती, भाषा आणि अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका काही सामाजिक संघटनांनी घेतली आहे.

दरम्यान, रेल्वे नियमांनुसार लोकल ट्रेनमधील जाहिरातींसाठी परवानगी आवश्यक असते. मात्र या भोजपुरी ऑडिशनच्या जाहिरातींना कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी बाबा बंगालीच्या जाहिरातींप्रकरणीही रेल्वे प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकीय पक्षांकडूनही या मुद्द्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काही नेत्यांनी याला मराठी जनतेच्या भावना दुखावणारा प्रकार असल्याचे म्हटले असून, लोकल ट्रेनमध्ये अशा स्वरूपाच्या जाहिरातींना तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काहींनी याला मुद्दाम वातावरण तापवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई लोकल ही केवळ वाहतुकीची व्यवस्था नसून, ती मुंबईच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे लोकलमधील जाहिराती, भाषिक संतुलन आणि नियमांचे पालन यावर प्रशासनाने अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com