कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा त्वरित मागे घ्या; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा त्वरित मागे घ्या; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा आणि प्रसार माध्यमांची मुस्काटदाबी थांबवावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने केली आहे. वास्तविक सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकशाही वृत्तवाहिनीने दाखविलेल्या या व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. किरीट सोमय्या यांच्या नैतिकतेचा या व्हिडीओने पर्दाफाश केला होता. पुन्हा किरीट सोमय्या यांनी हा व्हिडीओ बोगस असल्याचा दावा केला नाही. म्हणजे दाखविला गेलेला व्हिडीओ हा खरा व सत्यावर आधारीत होता. असे असताना काल सायबर पोलिसांनी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर रात्री उशिरा लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय दंडसंहिता कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६E, ६७A अंतर्गत ती कारवाई करण्यात आली आहे.

सत्य बातमी दाखविल्याबद्दल एका पत्रकाराच्या विरोधात केली गेलेली ही कारवाई धक्कादायक, संतापजनक आणि निषेधार्ह आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या मुस्काटदाबीच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. श्री. कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घेऊन सरकारने आपली चूक सुधारावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com