Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?
बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला तोडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप करत, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील जनता शिवसेनेला मानणारी आहे. पण भाजपला हे माहित होते की, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत त्यांना सत्ता मिळणार नाही, म्हणूनच त्यांनी शिवसेनेत फूट पाडली, असे जलील म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे वेगळे होणे सत्तेसाठी नव्हते, तर अहंकार व महत्वाच्या स्थानासाठी असलेल्या मतभेदांमुळे होते. राज ठाकरे यांना वाटायचे की त्यांना योग्य तो सन्मान मिळत नाही आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंना पुढे नेत आहेत, त्यामुळे त्यांनी वेगळी वाट घेतली होती. पण आज दोघांनाही समजले आहे की, त्यांच्या फूटीतून तिसऱ्याचा म्हणजेच भाजपचा फायदा झाला आहे. भाजपने शिवसेनेत फूट पाडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला आपल्या सोबत घेऊन सत्ता मिळवली, असा आरोप जलील यांनी केला.
राज आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लोक आनंदित झाले आहेत. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे, असे जलील यांनी स्पष्ट केले. भाजपने केवळ शिवसेनेला फोडले नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात केला आहे. आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर मिळाले आहे, असेही जलील म्हणाले.