Mumbai : मुंबईत एकाच वेळी 10 तृतीयपंथीयांचा जीव देण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं ?
मुंबईत एका धक्कादायक घटनेत कृष्णा आडेलकर नावाच्या व्यक्तीच्या अत्याचार आणि छळामुळे काही तृतीयपंथीयांनी ॲसिड आणि फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना तात्काळ राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन तृतीयपंथीयांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. किन्नर माँ संघटनेच्या अध्यक्षा सलमा खान यांनी सांगितले की, कृष्णा आडेलकर गेल्या काही महिन्यांपासून त्यांना सतत पैसे मागून धमक्या देत आहे. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी तसेच लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करण्याचा प्रकार तो करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सलमा खान यांनी म्हटले की, कृष्णा आडेलकरवर याआधीही गुन्हा दाखल झाला होता आणि तो दोन महिने तुरुंगात होता. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर त्याने आमच्यावर बदला घेण्यास सुरुवात केली आहे. तो सतत बदनामी करत असून, आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “कृष्णा आडेलकर आमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही पैसे देण्यास नकार दिला की तो आम्हाला धमक्या देतो आणि आमच्यावर अत्याचार करतो. यापुढे जर शासनाने या प्रकरणात लक्ष दिलं नाही, तर आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही,” असा इशारा किन्नर माँ संघटनेने दिला आहे.
या घटनेमुळे तृतीयपंथीय समाजामध्ये तीव्र संताप आणि असंतोष पसरला आहे. सलमा खान यांनी मागणी केली की, कृष्णा आडेलकरवर कठोर कारवाई करून त्याला तातडीने अटक करण्यात यावी, जेणेकरून पुढील अशा घटना घडू नयेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.