Pune : पुण्यात झाड कोसळून 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

Pune : पुण्यात झाड कोसळून 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

पुणे: पेशवे उद्यान परिसरात वृद्ध महिलेचा मृत्यू, झाड कोसळण्याच्या घटनांची वाढ.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यातील पेशवे उद्यान परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 76 वर्षीय शुभदा यशवंत सप्रे यांचा मृत्यू झाला. आनंदनगर, सिंहगड रस्ता येथील रहिवासी असलेल्या शुभदा सप्रे या रिक्षातून नातेवाईकांकडे जात असताना नीलायम चित्रपटगृहाजवळ रिक्षावर अचानक गुलमोहराचे झाड कोसळले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालक संजय अवचरे यांना किरकोळ दुखापत झाली असून, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांसह अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य करत जखमींना खासगी रुग्णालयात हलवले. दरम्यान, दत्तवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

मे महिन्यात 200 हून अधिक झाड कोसळण्याच्या घटना

महत्त्वाचे म्हणजे, मे महिन्यात पुणे शहरात झाड कोसळण्याच्या 200 हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामुळे नागरी प्रशासनाच्या देखभाल आणि नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही कर्वेनगर, ओंकारेश्वर, बिबवेवाडी व घोले रस्ता परिसरात अशाच घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काही प्रकरणांमध्ये नागरिकांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, व गुन्हे दाखलही झाले होते.

प्रशासन जागे केव्हा होणार?

पुन्हा एकदा अशा दुर्घटनांमुळे शहरातील धोकादायक झाडांचे वेळेवर निरीक्षण, छाटणी आणि देखरेख करण्याच्या गरजेवर भर देण्यात येत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने या विषयाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com