Jalna Crime : पैशाच्या वादातून नात्याची हत्या, मोठ्या भावानंच लहान भावासह पुतण्याला संपवलं
जालन्याच्या बदनापूर शहरात सख्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैश्यांच्या वादातून सख्या मोठ्या भावाने लहान भाऊ आणि पुतण्याची हत्या केली आहे. या बाप लेकाची हत्या करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी जेरबंद करण्यात आले असून जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
अशोक अंबिलढगे (वय 53 वर्ष) आणि यश अंबिलढगे (वय 20 वर्ष) या बापलेकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केली. अशोक यांनी त्यांचा मोठा भाऊ विष्णू याच्याकडून मुलीच्या लग्नासाठी काही पैसे उधार घेतले होते. या पैशांच्या वादातून अशोक आणि त्याचा मोठा भाऊ विष्णू यांच्यात भांडणं झाले होते. त्यानंतर काळ विष्णू याने आपल्या काही नातेवाईकांसह लहान भाऊ अशोक आणि पुतण्या यश याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. या घटनेचा तपास करत असताना बदनापूर पोलिसांनी मुख्य आरोपी विष्णू अंबिलढगे यांच्यासह अन्य चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.