Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप
शहरातील एका नामांकित खासगी शाळेत घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या शाळेतील क्रीडा शिक्षकाने ४ ते ५ विद्यार्थ्यांना वर्गातच कपडे काढून अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील एका उच्चभ्रू शाळेत घडला असून, या शाळेत अनेक आमदार, खासदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि शिस्तीबाबत एक वेगळीच ओळख आहे. मात्र या प्रकारानंतर शाळेच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
काय घडलं नेमकं?
शाळेतील एका क्रीडा शिक्षकाने कोणत्यातरी शिस्तभंगाच्या कारणावरून ४ ते ५ विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर बोलावून घेतले. यानंतर त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसमोर कपडे काढण्यास भाग पाडून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांना शारीरिक इजा झाल्याचीही माहिती आहे.
पालकांचा आक्रोश
हा प्रकार घडताच पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. काही पालकांनी शाळेतच गर्दी करून क्रीडा शिक्षकाच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. मात्र, शाळेच्या व्यवस्थापनाकडून सुरुवातीला कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. काही वेळाने केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगून प्रकरण थोपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.