Maharashtra politics : धुळ्यात अजित पवारांचा शिंदेंना दणका, शिवसेनेचा महानगर प्रमुख राष्ट्रवादीत

Maharashtra politics : धुळ्यात अजित पवारांचा शिंदेंना दणका, शिवसेनेचा महानगर प्रमुख राष्ट्रवादीत

धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतरांच्या मालिकेत आता एक मोठा धक्का महायुतीतील शिवसेनेला बसला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतरांच्या मालिकेत आता एक मोठा धक्का महायुतीतील शिवसेनेला बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकीय खेळीने थेट महायुतीतील सहकारी एकनाथ शिंदे यांना धक्का देत धुळ्यातील शिवसेनेचा हुकमी एक्का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेतला आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष निवडणूक रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले असून, काही ठिकाणी महाविकास आघाडीतील नेते महायुतीकडे वळताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी महायुतीतीलच नेते आपल्याच मित्र पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. धुळ्यात घडलेली ही घटना त्याचेच ठळक उदाहरण ठरली आहे.

शिवसेनेला धक्का, राष्ट्रवादीला बळ

धुळे महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर शिवसेनेचे धुळे महानगर प्रमुख संजय गुजराती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे संजय गुजराती यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने यांनीदेखील राष्ट्रवादीची वाट धरली आहे.

या पक्षप्रवेशामुळे धुळ्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या नेत्याच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

शिंदेंची डोकेदुखी वाढली

संजय गुजराती हे शिवसेनेचे महानगर प्रमुख असल्याने त्यांच्या पक्षांतराचा थेट फटका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. आता धुळ्यात शिवसेनेला नव्याने महानगर प्रमुखाची जबाबदारी देत संघटन पुन्हा उभे करावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच शिवसेनेची चिंता वाढली आहे.

निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

धुळे महापालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्षांमध्ये हालचाली तीव्र होत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून धुळ्यात आपली ताकद दाखवून दिली असून, आगामी निवडणुकीत या घडामोडींचा नेमका परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com