MP Bageshwar Dham Incident : बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; ढाब्याची भिंत कोसळली,1 एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी
MP Bageshwar Dham Incident : मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम परिसरात पुन्हा एकदा पावसामुळे दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे एका खासगी ढाब्याची भिंत कोसळून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. आर. पी. गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आज सकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे एका ढाब्याची भिंत अचानक पडली. या घटनेत 10 जण जखमी झाले असून, एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दोन भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत आणि आवश्यक असल्यास त्यांना इतर रुग्णालयात हलवले जाईल.
ही घटना ‘शर्मा ढाबा’ नावाच्या ठिकाणी घडली असून, तेथे काही भाविक विश्रांती घेत होते. अचानक भिंत कोसळल्याने काहीजण थेट मलब्याखाली अडकले. आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मलब्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्वरित उपचार सुरू केले असून, गंभीर जखमींची सखोल तपासणी केली जात आहे. प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ अॅम्ब्युलन्स पाठवून बचावकार्य सुरू केले. रुग्णालयात डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत आहे. काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत, तर एक-दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याआधीही बागेश्वर धाममध्ये दुर्घटना
केवळ काही दिवसांपूर्वी (3 जुलै रोजी) बागेश्वर धामच्या परिसरात पावसात एक तंबू कोसळल्याची घटना घडली होती. त्या दुर्घटनेत तंबूखाली झोपलेला एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन मरण पावला होता. त्यावेळी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केले होते की, तो तंबू जुन्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. काही लोक फक्त पावसापासून वाचण्यासाठी तिथे थांबले होते आणि त्यापैकी एक व्यक्ती झोपलेला असताना त्याच्यावर लोखंडी रॉड पडल्याने त्याचा मृत्यू झाला.