Phaltan Doctor Suicide : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात,आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने केले विविध दावे
थोडक्यात
माझा भाऊ निर्दोष असल्याचं आम्ही सिद्ध करू..
महिला डॉक्टरच माझ्या भावाला त्रास देत होती...
प्रशांत बनकरच्या बहिणीचा आरोप
फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने तळहातावर लिहिलेल्या संदेशात प्रशांत बनकरचेही नाव नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी प्रशांतला पुण्यात एका फार्महाऊसमधून शनिवारी पहाटे ताब्यात घेतले. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रशांत बनकर याची बहीण यांनी काही खुलासे केले असून, “माझा भाऊ निर्दोष असल्याचं आम्ही सिद्ध करू. महिला डॉक्टरच माझ्या भावाला त्रास देत होती,” असा आरोप केला आहे. मात्र प्रशांतच्या कुटुंबाने यातील सर्व आरोप फेटाळून लावत डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केले होते, असा दावा केला आहे.
आरोपी प्रशांतच्या भावाने सांगितले की, “माझा भाऊ कोणत्याही प्रकारे पळून गेला नव्हता. फलटणमधील घरातच त्याने पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला होता. कालपासून आमच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे आम्ही त्याला शरण जाण्यास सांगितले.”
दरम्यान, प्रशांतच्या बहिणीने डॉक्टरसोबतचे नाते स्पष्ट करताना सांगितले, “डॉक्टर गेल्या वर्षभर आमच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या. त्या माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायच्या. नेहमीच त्या तणावात असायच्या. माझा भाऊ काही दिवस आमच्यासोबत राहिला तेव्हा दोघांमध्ये साधा संवाद होत असे. त्यानंतर डॉक्टरने मेसेजवरूनच प्रेमाची कबुली दिली, पण भावाने तिला घरातील सदस्यासारखे मानत असल्याचे सांगून नकार दिला.”
तिने पुढे प्रश्न उपस्थित केला की, “जर माझा भाऊ मानसिक छळ करत होता, तर त्यांचे आई-वडील आमच्या घरी आले तेव्हा त्यांनी काहीच का बोलले नाही? लक्ष्मीपूजनालाही त्या आमच्यासोबत होत्या. अचानक त्यांनी तळहातावर माझ्या भावाचे नाव का लिहिले, हे कळत नाही. या उलट दाव्यांमुळे तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची बनली असून, सत्य समोर येण्यासाठी सर्व बाजूंची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे निरीक्षक व्यक्त करत आहेत.
