Mumbai Mayor : अजित पवारांच्या निधनाचा पार्श्वभूमीवर; महापौरपदाच्या निवडणुका लांबणीवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा परिणाम आता राज्याच्या राजकारणासह मुंबई महापालिकेच्या सत्तास्थापनेवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. बीएमसी निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दहा दिवस उलटले असतानाही अद्याप महापौरपदाची निवडणूक होऊ शकलेली नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे महायुतीची नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात आल्याने महापौरपदाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
बारामतीजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय वातावरणही सुन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कोकण भवनात होणारी भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची संयुक्त नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली. नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नियमानुसार, सर्व राजकीय पक्षांची अधिकृत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सात दिवसांच्या आत महापौरपदाची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. राजकीय पक्षांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बीएमसी सचिवांकडून महापौर निवडणुकीची तारीख निश्चित केली जाईल.
दरम्यान, भाजप आणि शिंदेसेनेचे नगरसेवक संयुक्त गट स्थापन करून एकत्र नोंदणी करणार होते. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये सध्या कोणताही संघर्ष नसून मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंगळवारी मुंबई उपनगर भवनात झालेल्या बैठकीत वेगवेगळी नोंदणी न करता संयुक्त नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तथापि, महापौरपदासोबतच स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद उफाळून आले असल्याचेही चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद, तसेच स्थायी समिती व इतर समित्यांमध्ये शिंदे गटाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे मुंबई महापालिकेतील सत्तास्थापना आणखी विलंबात सापडण्याची शक्यता आहे.
