27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांना KDMC मध्ये समाविष्ट करा; सर्व पक्षीय नेत्यांची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 27 गावातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वपक्षीय नेते धावले असून, 27 गावातील सफाई कामगारांच्या काम बंद आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठींबा देत या कर्मचाऱ्यांना केडीएमसीत समाविष्ट करण्याची मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 27 गावातील सफाई कामगारांना केडीएमसीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी 27 गावातील सफाई कामगार आक्रमक झाले आहेत. आज 27 गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे संतोष केणे, शिवसेना शिंदे गटाचे महेश पाटील, महेश गायकवाड, गुलाब वझे, भाजपाचे नंदू परब आदी सर्व पक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेत या कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी अशी मागणी केली.
दरम्यान पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून 27 गावांचा परिसर हा कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येत असल्याने येथील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय लक्षात घेता मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे आजचे आंदोलन हे या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाचे होते.

