Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ : महाराष्ट्र, केरळ सर्वाधिक प्रभावित; केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर
देशभरात कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असून महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या देशात ५,३६४ सक्रिय रुग्ण असून गेल्या २४ तासांत ७६४ नवीन रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १९२ नवीन रुग्ण आढळले असून तेथील एकूण रुग्णसंख्या आता १,६७९ वर पोहोचली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात १०७ नवीन रुग्ण आढळले असून पुणे आणि मुंबई ही दोन शहरे सर्वाधिक बाधित आहेत.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागानुसार जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण १,३६२ रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी ८६ नवीन रुग्ण आढळले, ज्यामध्ये पुणे शहरात ३१, मुंबईत २८, पिंपरी-चिंचवडमध्ये ७, ठाण्यात ६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४, नागपूरमध्ये ३, मीरा-भाईंदरमध्ये २ तर सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला. पुणे ग्रामीण भागातही २ रुग्ण नोंदवले गेले आहेत.
राज्यात जानेवारीपासून १६,२२६ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १,३६२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत एकूण ६४० रुग्णांपैकी ६३४ रुग्ण केवळ मे महिन्यात नोंदवले गेले आहेत. मृत्यूच्या बाबतीत, राज्यात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १७ रुग्ण आधीपासून गंभीर आजारांनी ग्रस्त होते. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्येही कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. गुजरातमध्ये १०७, छत्तीसगडमध्ये ५०, हरियाणामध्ये ३१ तर दिल्लीमध्ये ३० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये नवीन व्हेरिएंटवर संशोधन सुरू असून १,१८३ नागरिकांची तपासणी केली गेली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मॉक ड्रिल्सद्वारे रुग्णालयांतील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे व खाटांची उपलब्धता तपासण्यास सुरुवात केली आहे. सर्व राज्यांना आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले गेले असून संसर्ग वाढण्यापूर्वी प्रभावी व्यवस्थापन हा यामागील उद्देश आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर करणे, हात वारंवार धुणे, गर्दीपासून दूर राहणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून उपचार घेणे आवश्यक आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे.