FRP मध्ये वाढ, थेट 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ; कामगारांनाही दिसाला
केंद्र सरकारने 2025-26 साखर हंगामासाठी ऊसाची रास्त व किफायतशीर किंमत (FRP) प्रति क्विंटल 355 रुपये निश्चित केली आहे. ही किंमत मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे 4.41 टक्क्यांनी जास्त आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत घेण्यात आला. सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित सुमारे पाच लाख कामगार यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.
नवीन एफआरपी दर10.25 टक्के साखर वसुलीच्या आधारावर लागू होणार असून, प्रत्येक 0.1 टक्के अतिरिक्त वसुलीसाठी प्रति क्विंटल 3.46 रुपये अधिक दिले जातील. तसेच, वसुली 9.5 टक्क्यांपर्यंत घटली तरीही शेतकऱ्यांना किमान 329.05 रुपये प्रति क्विंटल दर हमखास मिळेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला असून, त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी किमान हमी दर सुनिश्चित केला गेला आहे."
ही सुधारणा येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2025-26 साखर हंगामापासून लागू होणार आहे. कृषी खर्च आणि मूल्य आयोग (CACP) यांच्या शिफारशींचा आणि राज्य सरकारांसह इतर संबंधित घटकांच्या सल्ल्याचा अभ्यास करून हा दर निश्चित करण्यात आला आहे.