India Vs England 4th Test Match : शुभमन गिलसमोर वाढते संकट; दुखापतींमुळे संघ अडचणीत, मँचेस्टरचा 'हा' इतिहासही चिंता वाढवणारा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे बुधवार, 23 जुलै रोजी सुरू होत आहे. मात्र या सामन्याआधीच कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. संघात अनेक खेळाडूंना दुखापतींमुळे मुकावे लागत असून, चौथ्या सामन्यासाठी अंतिम संघ निवडणं हे गिलपुढचं मोठं आव्हान ठरणार आहे.
अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला व्यायामादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याने तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, हे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीच अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांच्याही दुखापतींची चिंता होतीच. त्यामुळे गोलंदाजी विभागात नवोदित खेळाडूंवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. अंशुल कम्बोजला संधी मिळू शकते.
मँचेस्टरच्या ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मैदानावर भारताचा आजवर एकदाही विजय झाला नसल्याचा इतिहासही संघासाठी चिंता वाढवणारा आहे. येथे खेळलेल्या 9 कसोटी सामन्यांत भारताला 4 वेळा पराभव पत्करावा लागला असून, 5 सामने अनिर्णित राहिले आहेत. याउलट इंग्लंडने याच मैदानावर गेल्या 25 वर्षांत 14 सामने जिंकले आहेत.
कसोटी मालिकेत 1-2 अशा पिछाडीवर असलेला भारत या सामन्यात पराभूत झाल्यास मालिका गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून विशेष अपेक्षा आहेत.
ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत असल्याने त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळवावे का यष्टिरक्षणाचीही जबाबदारी द्यावी, याचा निर्णय घेणेही गिलसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारी झालेल्या सराव सत्रात पंतने यष्टिरक्षणाचा सराव केल्याने त्याची तयारी कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, या सामन्याच्या दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू फरुख इंजिनियर आणि वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांना 'ओल्ड ट्रॅफर्ड'च्या स्टँडला त्यांच्या नावाने सन्मानित करण्यात येणार आहे.