India Vs England 4th Test Match : आजचा दिवस ठरणार निर्णायक; सामना जिंकून भारत बरोबरीला येणार की इंग्लंड बाजी मारणार ?
मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दिवसअखेर 174 धावांवर 2 गडी बाद अशी स्थिती झाली असून इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीपैकी 137 धावा भारताने कमी केल्या आहेत. दुसऱ्या डावात सलामीला मोठा धक्का बसल्यानंतर शुभमन गिल आणि के.एल. राहुल यांनी अर्धशतकी खेळी करत डाव सावरला.
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. इंग्लंडच्या क्रिस वोक्सने पहिल्याच ओव्हरमध्ये सलग दोन चेंडूंवर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांना माघारी धाडले. दोघांनी पहिल्या डावात अर्धशतके झळकावली होती. पण दुसऱ्या डावात त्यांना खातेही उघडता आले नाही.
दिवसाच्या अखेरीस शुभमन गिल आणि के.एल. राहुल नाबाद राहिले. त्यांनी संयम आणि चतुराईने फलंदाजी करत इंग्लंडच्या आघाडीला मर्यादा घातली.
याआधी इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा करत भारतावर मोठा दडपण आणले. त्यावेळी भारताच्या गोलंदाजांमध्ये फक्त रविंद्र जडेजा याने काही प्रमाणात प्रभाव दाखवला, त्याने 4 बळी घेतले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने 141 धावांची दमदार खेळी करत दोन वर्षांनंतर शतक झळकावले. शिवाय, त्याने सामन्यात 5 बळीही घेतले असून अशा प्रकारे शतक आणि 5 विकेट्स दोन्ही मिळवणारा तो कसोटी इतिहासातील पाचवा पुरुष कर्णधार ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने एका डावात 100 हून अधिक धावा दिल्या. जो रूटने 248 चेंडूंमध्ये 150 धावा करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्याने स्टोक्ससोबत 142 धावांची भागीदारी करत भारतासाठी अडचण निर्माण केली. रूटनंतर जडेजाकडून बाद झाला तर स्टोक्सला दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर जावे लागले.
भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
चौथ्या दिवसाचा खेळानंतर के. एल. राहुल (87) आणि शुभम गिल (78) यांनी नाबाद संयमी आणि जबाबदारीने फलंदाजी करत 180 धावांची अभेद्य भागीदारी केली. के. एल. राहुलने मालिकेतील चौथे अर्धशतक साजरे केले असून त्याच्या नावावर याआधी 2 शतकेही आहेत. गिलने मागील डावांतील चुका सुधारून आत्मविश्वासाने फलंदाजी केली आहे.
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने शतक झळकावले आणि कसोटीत 7 हजारांहून अधिक धावा व 200 हून अधिक बळींचा ऐतिहासिक विक्रम केला. जॉफ्रा अर्चरचा अंतिम दिवशी खेळ निर्णायक ठरू शकतो. भारताला सामन्यात टिकून राहून कसोटी वाचवायची आहे, तर इंग्लंडला मालिका जिंकण्याची संधी साधायची आहे.
दुसऱ्या डावात भारत आता 137 धावांनी मागे असून पाचवा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. रविवारी अंतिम दिवशी प्रेक्षकांना चुरशीचा थरार पाहायला मिळणार आहे.