B Sudarshan Reddy Meets Thackeray : INDIA आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी ठाकरेंच्या भेटीला; उपराष्ट्रपतीपदावरुन गुप्त चर्चा
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत रेड्डींना पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या फोनवरही प्रतिक्रिया दिली.
ठाकरेंनी सांगितले की, “फडणवीसांनी मला फोन केला ही गोष्ट खरी आहे. पण ज्यांनी माझा पक्ष फोडला, माझे उमेदवार जनतेनं निवडून आणले, त्यांचाच आधार मागणं ही आश्चर्याची बाब आहे. यामागे काय अर्थ आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “मीच आता फडणवीसांना फोन करणार आहे आणि त्यांना सुदर्शन रेड्डींना मतदान करण्याची विनंती करणार आहे.” यावेळी त्यांनी पूर्वीच्या अनुभवांवरही भाष्य केलं. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी मी विनंती न करता पाठिंबा दिला होता.
निवडून आल्यानंतर किमान एक कर्टसी कॉल अपेक्षित होता, पण तोही आला नाही. गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या अशी भूमिका आम्ही मान्य करणार नाही,” असं ठाकरे म्हणाले.या विधानातून उद्धव ठाकरेंनी एनडीएवर निशाणा साधत सुदर्शन रेड्डींना ठाम पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं.