'इंडिया आघाडी'त बिघाडी? भोपाळमध्ये होणारी पहिली जाहीर सभा तडकाफडकी रद्द
इंडिया आघाडीची पहिली समन्वय बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली होती. या बैठकीत इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे घेण्याचे ठरले होते, पण अचानक ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, अशी माहिती के सी वेणुगोपाल यांनी दिली होती. पण वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
पण ही सभा का रद्द करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे 'इंडिया आघाडी'त सर्वकाही आलबेल आहे ना, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चाणा उधाण आलं आहे.