India-Pakistan Prisoners List : पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा! भारत-पाकिस्तानमध्ये कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण
भारत आणि पाकिस्तान यांनी सोमवारी एकमेकांच्या ताब्यात असलेल्या नागरी कैद्यांच्या आणि मच्छीमारांच्या यादीची देवाणघेवाण केली आहे. ही देवाणघेवाण दोन्ही देशांदरम्यान झालेल्या 2008 च्या "दुतावास प्रवेश करार" अंतर्गत झाली आहे. या करारानुसार दरवर्षी दोन वेळा, म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी ही यादी अदलाबदल केली जाते. यावेळी भारताने पाकिस्तानकडे 382 नागरी कैद्यांची आणि 81 मच्छीमारांची यादी दिली, जे पाकिस्तानचे नागरिक असावेत असा संशय आहे.
त्याचप्रमाणे पाकिस्तानने भारताकडे 53 नागरी कैद्यांची आणि 193 मच्छीमारांची यादी दिली, जे भारताचे नागरिक असावेत असा अंदाज आहे.भारत सरकारने पाकिस्तानकडे मागणी केली आहे की, 159 भारतीय कैद्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे, कारण त्यांनी शिक्षा पूर्ण केली आहे. तसेच, 26 भारतीय असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांची भेट द्यायला मिळावी, अशी मागणीही केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानकडे हेही स्पष्ट केलं आहे की, ताब्यात असलेल्या भारतीय कैद्यांची आणि मच्छीमारांची काळजी घेण्यात यावी, त्यांची सुरक्षितता आणि आरोग्य जपले जावे.
तसेच, सध्या भारताच्या ताब्यात असलेल्या 80 संशयित पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवता यावे, यासाठी भारताने पाकिस्तानकडे विनंती केली आहे. सीमावर्ती भागात मासेमारी करताना अनेक वेळा दोन्ही देशांचे मच्छीमार चुकून सीमारेषा ओलांडतात आणि त्यामुळे त्यांना अटक होते. अशा यादींच्या देवाणघेवाणीतून दोन्ही देशांत मानवी हक्कांचे रक्षण आणि सहकार्याचा मार्ग मोकळा होतो.