India Bangladesh Relations : भारत–बांगलादेश संबंध बिघडले, भारतीयांसाठी व्हिसा सेवा थांबवण्याचा घेतला निर्णय
भारत-बांगलादेश संबंधांमध्ये सध्या मोठा तणाव निर्माण झाला असून बांगलादेशने भारतीय नागरिकांसाठी सर्वसाधारण व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, आगर्तळा, मुंबई, गुवाहाटी आणि चेन्नई येथील बांगलादेशी दूतावास व वाणिज्य दूतावासांना तात्काळ प्रभावाने सामान्य व्हिसा देणे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयने हा निर्णय आयपीएलमधून बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयचे म्हणणे होते. सहा हिंदूंची गेल्या १८ दिवसांत हत्या झाल्याच्या घटनांनी परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. दरम्यान, बांगलादेशात उस्मान हादी यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला. निदर्शकांकडून भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि भारतीय दूतावासांवरही हल्ले झाले. यानंतर भारताने चितगावमधील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र बंद करून बांगलादेशी नागरिकांसाठी व्हिसा सेवा आधीच स्थगित केली होती.
याच दरम्यान सुरक्षेची कारणं पुढे करून बांगलादेशने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भारत आणि बांगलादेशात गेल्या काही महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांची सत्ता गेल्यावर ते भारतात राहत असून यामुळे बांगलादेशासोबत भारताचे संबंध बिघडल्याचे म्हटले जात आहे. तसेच, व्हिसा संबधित विचारणा करताच बांगलादेशच्या मंत्रालयाने स्पष्ट करत म्हणाले की, सध्याच्या या गंभीर परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच, कोणत्याही एका गोष्टीवरून हा निर्णय न घेता अनेक गोष्टींवरून घेतल्याचे बांगलादेशच्या सरकारने सांगितले आहे. यामुळे बांगलादेशात यापुढे भारतीयांना जाता येणार नसल्याचे ही सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच भारताने बांगलादेशातून येणाऱ्या काही लोकांवर कडक निर्बंध लादले होते, आणि कडक कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु, भारताला या निर्णयाचा फारसा फरक पडणार नाही. कारण, भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या लोकांची संख्या तशी फार कमी आहे.
