Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने
थोडक्यात
आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एक रोमहर्षक सामना निश्चित झाला आहे.
करो-मरोच्या सामन्यात पाकिस्तानने यूएईवर 41 धावांनी विजय मिळवत पुढे वाटचाल केली.
त्यामुळे 21 सप्टेंबरला होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत.
आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एक रोमहर्षक सामना निश्चित झाला आहे. लीग फेरीत भारताने पाकिस्तानचा सहज पराभव केला होता, तर करो-मरोच्या सामन्यात पाकिस्तानने यूएईवर 41 धावांनी विजय मिळवत पुढे वाटचाल केली. त्यामुळे 21 सप्टेंबरला होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत.
यूएईविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के बसले, पण फखर जमनने संयमी व धडाकेबाज खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढलं. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने 146 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात यूएईकडून राहुल चोप्राने प्रयत्न केला, पण शाहीन आफ्रिदी व हारिस रऊफ यांच्या भेदक माऱ्यापुढे संघ टिकू शकला नाही.
लीग फेरीत भारताने सात विकेट्स राखून पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मात्र आता सुपर-4 मधील सामना वेगळ्या दबावाखाली होणार असून पाकिस्तान अधिक तयारीनिशी मैदानात उतरेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हा सामना केवळ क्रिकेटपुरता न राहता, चाहत्यांच्या भावनांनाही साद घालणारा ठरणार आहे.
विशेष म्हणजे, भारत-पाकिस्तान सामन्यांवरून नेहमीच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेची लाट उठत आली आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरचा हा ‘महासंग्राम’ मैदानाबाहेरही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.