Australia Shocker : ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडमध्ये भारतीयांवर वर्णद्वेषातून हल्ले; दोन जण गंभीर जखमी
ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरात आणि आयर्लंडच्या डब्लिनमध्ये भारतीय व्यक्तींवर झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमुळे जगभरातील भारतीय समुदायात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
अॅडलेडमध्ये 23 वर्षीय भारतीय विद्यार्थी चरणप्रीत सिंग याच्यावर स्थानिक टोळक्याने पार्किंग परिसरात अचानक हल्ला चढवला. वर्णद्वेषपूर्ण टिप्पणी करत त्याला शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला, जबड्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कारवाई करत एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, आयर्लंडच्या डब्लिन शहरातही अशाच प्रकारची संतापजनक घटना समोर आली आहे. ॲमेझॉन कंपनीत नुकतीच नोकरी स्वीकारलेला 40 वर्षीय भारतीय कर्मचारी मैदानाजवळ उभा असताना काही तरुणांनी त्याच्याशी हुज्जत घालत वर्णद्वेषी शिवीगाळ केली. "मुलांशी गैरवर्तन केल्याचा", आरोप करत त्याच्यावर जबर मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले. स्थानिक नागरिकांनी जखमी भारतीयाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आयर्लंडमधील भारतीय राजदूत अखिलेश मिश्रा यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या दोन्ही घटनांनी पुन्हा एकदा परदेशात भारतीय सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित देशांतील प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.