Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, हवामान विभागाचा इशारा
राज्यात सध्या थंडीचे प्रमाण चढ-उतार घेत आहे. अनेक ठिकाणी तापमान 6 अंशांच्या आसपास घसरले असून गारठा वाढत चालला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने थंडीचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि रात्री थंड वारे जाणवत आहेत. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असल्याने तिथून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. पुढील काही दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता असून डिसेंबर महिन्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर भारतातील पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात तापमान मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावरही दिसत आहे. परभणी, धुळे, निफाड, जळगाव येथे तापमान 6 ते 7 अंशांदरम्यान नोंदले गेले. नाशिक, पुणे आणि मालेगावमध्ये पारा 9 अंशांपर्यंत खाली आला.
भंडारा आणि गोंदिया येथे तापमान सुमारे 10 अंश होते. निफाड, धुळे, परभणी आणि अहिल्यानगर भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, नंदूरबार, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे नाशिकच्या निफाड तालुक्यात तीव्र गारठा जाणवत आहे. सलग सहा दिवस तिथे तापमान 5 ते 6 अंशांदरम्यान आहे. काही भागात तर 5.3 अंशांपर्यंत तापमान घसरले. या कडाक्याच्या थंडीत कांदा उत्पादक शेतकरी बाजारात जाताना शेकोटीचा आधार घेत आहेत. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
थोडक्यात
राज्यात सध्या थंडीचे प्रमाण चढ-उतार घेत आहे.
अनेक ठिकाणी तापमान 6 अंशांच्या आसपास घसरले असून गारठा वाढत चालला आहे.
यामुळे भारतीय हवामान विभागाने थंडीचा इशारा दिला आहे.

