Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय; तिकीट रद्द केल्यास मिळणार नाही रिफंड

Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय; तिकीट रद्द केल्यास मिळणार नाही रिफंड

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसच्या तिकीट रद्द व रिफंड नियमांमध्ये बदल केले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसच्या तिकीट रद्द व रिफंड नियमांमध्ये बदल केले आहेत. या प्रिमियम ट्रेनसाठीचे नियम आता अधिक कडक करण्यात आले असून, प्रवाशांना तिकीट रद्द करताना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या ट्रेनसाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

नवीन नियमानुसार, ट्रेन सुटण्याच्या ८ तासांआधी कन्फर्म तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड मिळणार नाही. यापूर्वी इतर सामान्य आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी सुटण्याच्या ४ तास आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास परतावा मिळत होता. मात्र आता वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेससाठी ही मर्यादा वाढवून ८ तास करण्यात आली असून, त्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास संपूर्ण रक्कम जप्त केली जाणार आहे.

याआधी लागू असलेल्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास २५ टक्के शुल्क कापले जात होते. तर ७२ ते ८ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास ५० टक्के शुल्क आकारले जात होते. मात्र वंदे भारत आणि अमृत भारतसारख्या प्रिमियम ट्रेनसाठी रिफंड शुल्क आधीपासूनच जास्त होते. आता तर ८ तासांच्या आत रद्द केल्यास रिफंड पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवे नियम प्रिमियम स्वरूप आणि ऑपरेशनल रचनेमुळे लागू करण्यात आले आहेत. वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत एक्सप्रेस या ट्रेन १०० टक्के कन्फर्म बर्थसह चालतात. या ट्रेनमध्ये RAC किंवा वेटिंग लिस्टची सुविधा नसते. म्हणजेच, प्रत्येक प्रवाशाला तिकीट बुकिंगची पूर्ण हमी दिली जाते.

अशा परिस्थितीत, शेवटच्या क्षणी तिकीट रद्द झाल्यास त्या जागेसाठी नवीन प्रवासी मिळत नाही, आणि त्यामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसतो. हाच तोटा टाळण्यासाठी रेल्वेने रिफंडचे नियम अधिक कठोर केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशातील पहिली अमृत भारत स्लीपर कोच ट्रेन जानेवारी २०२६ पासून सेवेत दाखल करण्यात आली आहे. या नव्या ट्रेनसाठी सुरुवातीपासूनच कडक रिफंड नियम लागू करण्यात आले असून, प्रवाशांनी तिकीट बुक करताना प्रवासाची खात्री करूनच आरक्षण करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com