Indian Women's Hockey Team : आशिया कपमध्ये भारताचा तुफानी विजय; थायलंडवर 11-0 ने मात
भारताने आशिया कप महिला हॉकी स्पर्धेला तुफानी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने थायलंडवर 11-0 असा मोठा विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. आक्रमणात दीपिका आणि बचावात गोलरक्षक सविता पुनिया यांची अनुपस्थिती असूनही संघाने कोणतीही उणीव भासू दिली नाही. कर्णधार सलिमा टेटेच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्याच लढतीत आत्मविश्वासाने भरलेली कामगिरी साकारली.
या सामन्यात डुंग डुंग ब्यूटी हिने सर्वाधिक 3 गोल करून चमक दाखवली. मुमताझ खान आणि उदिता यांनी प्रत्येकी 2 गोल नोंदवले. त्याचबरोबर संगीता कुमारी, लालरेमसियामी, शर्मिला देवी आणि ऋतुजा पिसाळ यांनी प्रत्येकी 1 गोल करून भारताचा विजय भक्कम केला. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या सत्रात 2, दुसऱ्या सत्रात 3 आणि अखेरच्या सत्रात तब्बल 5 गोल करून थायलंडला कोणतीही संधी दिली नाही.
मुमताझ खानने सहाव्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर संगीता, डुंग डुंग आणि लालरेमसियामी यांच्या गोलमुळे भारताने मध्यांतराला 5-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सत्रात डुंग डुंगने आणखी 1 गोल केला. चौथ्या सत्रात मात्र भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत सलग गोलांची मालिका सुरू ठेवली आणि विजय निश्चित केला.
याआधी भारताने ही स्पर्धा 2 वेळा जिंकली आहे. मात्र, मागील आवृत्तीत संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा संघाचे प्रमुख ध्येय आशिया कप जिंकून वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवणे आहे. थायलंडविरुद्धचा एकतर्फी विजय पाहता भारतीय संघाची तयारी जोरात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.