Donald Trump vs India : अमेरिकेला भारताकडे यावं लागणार! 'या' वस्तू आयात कराव्या लागतील; ट्रम्प प्रशासनाची चिंता वाढली
भारत आणि अमेरिकेतील व्यापारसंबंध गेल्या काही महिन्यांत तणावपूर्ण झाले आहेत. अमेरिकेने भारतातून होणाऱ्या आयातीवर तब्बल 50 टक्के कर लादल्यामुळे कापड आणि काही इतर उद्योगांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: सुरत, नोएडा आणि तिरुपूरमधील अनेक उत्पादन कंपन्यांना आपले कामकाज कमी करावे लागले असून, भारतातून अमेरिकेला जाणारी निर्यात जवळपास 70 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचा थेट परिणाम 55 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर होण्याची शक्यता आहे.
मात्र या परिस्थितीत अमेरिकेलाही काही क्षेत्रांत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण काही महत्त्वाच्या वस्तू फक्त भारतातच मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या उत्पादनांसाठी अमेरिकेसमोर भारताकडून खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. इतर देशांकडून आयात केल्यास खर्च अधिक वाढणार असून, पुरवठाही सातत्याने होईलच याची खात्री नाही.
कोणत्या वस्तूंवर कर नाही?
अमेरिकेने औषधं, इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा आणि पेट्रोलियम पदार्थांवर 50 टक्के कर लावलेला नाही. यातील काही वस्तूंवर फक्त 25 टक्के कर आहे, ज्यात लोह, अॅल्युमिनियम, तांबे आणि त्यापासून बनलेली उत्पादने यांचा समावेश आहे.
फार्मा उद्योग : भारतातून अमेरिकेला जेनेरिक औषधांचा मोठा पुरवठा होतो. अमेरिकेची आरोग्य व्यवस्था तुलनेने स्वस्त भारतीय औषधांवर अवलंबून आहे. या औषधांवर जास्त कर लावल्यास किंमत दुप्पट होऊन सामान्य नागरिकांना त्रास होण्याची भीती व्यक्त केली जाते.
स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स : अॅपल, सॅमसंगसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा कच्चा माल व उत्पादनाचा मोठा भाग आता भारतात तयार होतो. त्यामुळे जर या वस्तूंवर कर लावला, तर अमेरिकन बाजारात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती वाढतील आणि विक्री कमी होण्याचा धोका आहे.
भारताची पुढील चाल?
सध्या या उत्पादनांवर अमेरिकेकडून दिलासा असला तरी भारत स्वतःच्या हितासाठी निर्यात कर लागू करण्याचा विचार करत आहे. जर असा निर्णय झाला, तर अमेरिकेच्या बाजारपेठेत आणखी दबाव वाढू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार तणाव पुढे कसा वळण घेतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.