भारताचा गुकेश बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता; चीनच्या डिंग लिरेनचा पराभव
भारताने जगाला दिलेली खास भेट म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. आज बुद्धिबळाच्या खेळाचं विश्वविजेतेपद पुन्हा भारताकडे आलं आहे. भारताचा डी. गुकेश बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता ठरला. विश्वनाथन आनंद नंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरला आहे. १८ वर्षीय गुकेशवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
असा रंगला सामना
१८ वर्षीय गुकेशची चीनच्या डिंग लिरेनसोबत लढत होती. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत १३व्या डावापर्यंत दोघांचे ६.५ इतके गुण झाले होते. आज अखेरची १४वी आणि निर्णायक लढत होती. या लढतीत डिंग पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळला. चौदा डावानंतर सर्वप्रथम ज्या खेळाडूचे ७.५ गुण होतील ते विजेता ठरणार होता. या अखेरच्या लढतीत बाजी मारत गुकेशने इतिहास घडवला. चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विश्वविजेतेपद मिळवले.
१४व्या लढतीच्या आधी झालेल्या १३ डावांपैकी पहिला डाव ३२ वर्षीय डिंग लिरेनने जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली होती. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्समधील सलग ७ डाव बरोबरीत सुटले होते. अखेर ११व्या डावात विजय मिळून गुकेशने आघाडी घेतली. तेव्हा गुकेशने ६-५ अशी आघाडी मिळवली होती. मात्र डिंगने १२ व्या डावात बाजी मारली आणि पुन्हा एकदा बरोबरी झाली. १३वा डाव बरोबरीच सुटल्याने आजचा डाव निर्णयक होता. आज देखील बरोबरी झाली असती तर जलद टायब्रेकरने विजेता ठरवला गेला असता.
११ वर्षांनी भारताला मिळाला मान
गुकेशच्या आधी २०१३ साली भारताच्या विश्वनाथन आनंदने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ११ वर्षांनी देशाला हा मान पुन्हा मिळाला आहे. चीनचा डिंग लिरेन हा या स्पर्धेतील गतविजेता होता.
बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर
चेन्नईचा १८ वर्षीय गुकेश डी हा बुद्धिबळ इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे. तो २०१९ साली ग्रँडमास्टर झाला होता. बुद्धिबळात २७०० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा तो तिसरा सर्वात लहान खेळाडू आहे. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी गुकेशने तत्कालीन जगज्जेता मॅग्रस कार्लसनचा पराभव केला होता.
इंटरनॅशनल चेस फेडरेशनने गुकेशच्या विजयी क्षणाची प्रतिक्रिया टिपली आहे. ज्यामध्ये गुकेश हा भारावून गेला असून पटावर सर्व सोंगट्या जागेवर ठेवत आहे. आणि त्यानंतर त्याने पटाला हात जोडून नमस्कार केले आहेत. गुकेशची प्रतिक्रिया पाहण्यासाठी क्लिक करा-