Indigo : इंडिगो कर्मचाऱ्यांचा अचानक संप; मुंबई विमानतळावर उड्डाणे विस्कळीत, प्रवाशांची मोठी गैरसोय
मुंबईतून प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन छेडल्यामुळे विमानतळावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक फ्लाइट्स उशिराने सुटत आहेत तर काही उड्डाणे रद्दही करण्यात आली आहेत. ही परिस्थिती कॅबिन क्रू आणि व्यवस्थापन यांच्यात शिफ्टसंदर्भात झालेल्या वादातून निर्माण झाली. मतभेद तीव्र झाल्याने कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इंडिगोचे ऑपरेशन्स विस्कळीत
इंडिगो ही देशातील अग्रगण्य विमानसेवा असून, तिच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उड्डाण वेळापत्रक पूर्णपणे ढासळले आहे. उड्डाणे रद्द व उशिराने होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
याआधीही २ डिसेंबर रोजी इंडिगोच्या कुवेत–हैदराबाद उड्डाणाला बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यामुळे त्या दिवशीही उड्डाणे विलंबाने झाली होती. सलग दोन दिवस प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई विमानतळावरील गर्दी वाढली
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ मानला जातो. रोज 900–950 विमानांची हालचाल इथे होते. सणासुदीच्या काळात ही संख्या 1000 पेक्षा जास्त जाते. इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी असून, कमी खर्चात सेवा देण्याकरिता तिची विशेष ओळख आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय शहरांना ही विमान कंपनी जोडते. या विमानसेवेची स्थापना 2005 मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी केली.

