Crime News : परभणीत सामूहिक अत्याचाराची घटना; पालकमंत्र्यांची कठोर कारवाईची घोषणा
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात दिवाळीच्या काही दिवस आधीच एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोगाव देवी संस्थान, इटोली परिसरात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी घडली असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत झाडाखाली बसून बोलत होती. त्याचवेळी सहा जणांचा टोळका तिथे आला. त्यांनी त्या तरुणाला पकडून ठेवले आणि त्यातील तीन जणांनी तरुणीवर अत्याचार केला, तर उर्वरित तिघांनी मदत केली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केला होता. घटनेनंतर पीडितेकडून पाच हजार रुपये लुटल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन विनीवाल यांच्या नेतृत्वाखाली आठ विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. या घटनेची दखल घेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा होईल. त्यांनी समाजाला आवाहन केले की, “अशा निर्जन ठिकाणी तरुण-तरुणींनी जाणं टाळावं आणि स्वसंरक्षणासाठी काळजी घ्यावी.”
मेघना बोर्डीकर यांनी पुढे म्हटले की, “समाजात विकृत मानसिकता वाढत आहे. अशा प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी समाजाने एकत्र यायला हवे.” पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई केली असून, पुढील तपास जोरात सुरू आहे.