Delhi Crime : भयंकर! नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळला सुटकेसमध्ये; अत्याचार करून आरोपीनं केली जबर मारहाण
दिल्लीतील नेहरू विहार परिसरात शनिवारी रात्री एका सुटकेसमध्ये एक गंभीर जखमी मुलगी आढळली. मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती. बलात्कारानंतर तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचे वय नऊ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
या खळबळजनक प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील तिला रुग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी मुलगी बेशुद्ध होती, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबाने त्याच कॉलनीत राहणाऱ्या नौशादवर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. घटनेपासून आरोपी फरार आहे.
पीडित मुलीचे वडील म्हणाले की, मी मुलीला शेजारच्या घरी जाताना पाहिले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की मुलगी शनिवारी संध्याकाळी तिच्या आजीच्या घरी बर्फ देण्यासाठी गेली होती. बराच वेळ ती परत आली नाही, तेव्हा त्यांनी तिचा शोध सुरू केला. मुलगी तिच्या आजीच्या घरी पोहोचली नसल्याचे कळले. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी सांगितले की त्यांनी मुलीला जवळच्या फ्लॅटमध्ये जाताना पाहिले होते.
जेव्हा कुटुंब फ्लॅटवर पोहोचले तेव्हा ते बंद होते. कुलूप तोडून आत गेल्यावर त्यांना एक सुटकेस आढळली ज्यातून रक्त येत होते. सुटकेस उघडताच मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
आरोपीविरोधात (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. आरोपीच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी नौशाद त्याच फ्लॅटमध्ये राहतो, जिथे मुलगी सुटकेसमध्ये सापडली होती. तो बिर्याणी विकतो. त्याची पत्नी तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली आहे, त्यामुळे तो घरात एकटाच होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. दिल्ली व्यतिरिक्त, ही पथके हापूर, गाझियाबाद आणि उत्तर प्रदेशातील आसपासच्या भागातही छापे टाकत आहेत.