Vasant Dada Sugar Institute : व्हीएसआयच्या अनुदानाच्या वापराबाबत चौकशी, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय
थोडक्यात
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (VSI)ला मिळणाऱ्या शासन अनुदानाच्या वापराबाबत चौकशी सुरू करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने या संदर्भात निर्णय घेतला
आयुक्त (साखर) यांच्या नेतृत्वात एक विशेष चौकशी समिती गठित केली आहे.
Vasant Dada Sugar Institute : वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (VSI)ला मिळणाऱ्या शासन अनुदानाच्या वापराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने या संदर्भात निर्णय घेतला असून, आयुक्त (साखर) यांच्या नेतृत्वात एक विशेष चौकशी समिती गठित केली आहे. ही समिती अनुदानाचा वापर त्याच्या उद्देशानुसार झाला आहे का, याची तपासणी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.
मंत्री समितीच्या बैठकीत आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. व्हीएसआयला दिल्या जाणाऱ्या अनुदानावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. साखर कारखान्यांपासून प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया कमी करून हा निधी व्हीएसआयला दिला जातो. मात्र, या निधीचा वापर वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या उद्देशांसाठी योग्य आहे का, याची चौकशी केली जाईल.
चौकशी समितीला ठराविक कालावधीत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारावर शासन पुढील निर्णय घेईल. शरद पवार हे वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असल्यामुळे चौकशीमुळे वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे.

