Internet Ownership : संपूर्ण इंटरनेटवर कोणाचं नियंत्रण? जगभरात इंटरनेट पोहोचवणारे नेटवर्क आणि पुरवठादार कोण?
Internet Ownership: आजच्या जगात इंटरनेट हे पाणी-विजेसारखेच गरजेचे झाले आहे. भारतात तर दररोज कोट्यवधी लोक इंटरनेट वापरतात. मात्र एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो—या इंटरनेटचा मालक नक्की कोण?
खरं सांगायचं तर इंटरनेट कोणत्याही एक सरकार, व्यक्ती किंवा कंपनीच्या ताब्यात नाही. ते असंख्य छोट्या-मोठ्या नेटवर्क्सना जोडून तयार झालेले जागतिक जाळे आहे. केबल्स, सर्व्हर, डेटा सेंटर आणि नेटवर्क यांचे वेगवेगळे मालक आहेत, पण संपूर्ण इंटरनेटचा एकच मालक नाही. या व्यवस्थेच्या टॉपवर मोठ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क कंपन्या आहेत. त्या समुद्राखालून फायबर केबल टाकून देशोदेशी इंटरनेट पोहोचवतात. टाटा कम्युनिकेशन्स, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा यांसारख्या कंपन्या या स्तरावर काम करतात. त्यांच्या नेटवर्कवरून इतर कंपन्या इंटरनेट घेतात.
पुढील टप्प्यावर टेलिकॉम कंपन्या येतात. भारतात जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, बीएसएनएल या कंपन्या देशभर नेटवर्क पसरवतात. शेवटच्या टप्प्यावर स्थानिक ऑपरेटर इंटरनेट घराघरात पोहोचवतात. जगातील बहुतांश इंटरनेट समुद्राखालील केबल्समधून चालते. भारतात मुंबई, चेन्नई आणि कोच्ची येथे अशा केबल्स जमिनीवर येतात. भविष्यात उपग्रहांद्वारे इंटरनेट देण्याचा प्रयत्न करणारी एलॉन मस्क यांची स्पेसएक्सही या क्षेत्रात नवे समीकरण आणू शकते. थोडक्यात, इंटरनेट हे कोणाच्याही एकट्याच्या मालकीचे नसून जगभरच्या सहकार्यावर चालणारे एक विशाल जाळे आहे.

