Sanjay Raut : अजित पवार विमान अपघाताची चौकशी करा; राऊतांची मागणी

Sanjay Raut : अजित पवार विमान अपघाताची चौकशी करा; राऊतांची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन अवघे २४ तास उलटत नाहीत, तोच त्यांच्या नावावरून राजकीय हालचाली सुरू झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर जोरदार टीका केली. “अजितदादांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या नावाने राजकारण करणारे लोक अमानूष आहेत,” अशा कठोर शब्दांत राऊत यांनी फटकारले.

राजकीय चर्चा अमानूषपणाची – राऊत

“अजितदादांना कालच अग्नी दिला आहे. त्यांचं जाणं केवळ एका नेत्याचं नाही, तर एका कर्तृत्ववान व्यक्तीचं जाणं आहे. त्याचा सर्वाधिक आघात त्यांच्या कुटुंबावर, तळागाळातील कार्यकर्त्यांवर आणि सामान्य माणसांवर झाला आहे,” असे सांगत राऊत म्हणाले की, मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद किंवा सत्ता यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. “पुढील १५ ते २० दिवस तरी कोणतीही राजकीय चर्चा होऊ नये. अशावेळी नेतृत्वाचे डावपेच खेळणं हे अमानूषपणाचं लक्षण आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला

अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. “कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. अशा अवस्थेत त्यांच्या कुटुंबीयांबाबत किंवा पक्षांतर्गत निर्णयांबाबत चर्चा करणे अयोग्य आहे,” असे राऊत म्हणाले. कोण मंत्री होणार, कोण नेतृत्व करणार यावर चर्चा करणाऱ्यांना त्यांनी “कर्तव्यशून्य” ठरवले. “कोणी हा विषय काढत असेल, मग तो मंत्री असो वा आमदार, तो अमानूष आहे,” असेही ते म्हणाले.

विमान अपघाताची चौकशी गरजेची

या दुर्घटनेनंतर संजय राऊत यांनी अपघाताच्या चौकशीची जोरदार मागणी केली. “डीजीसीएच्या अखत्यारीत विमान संचालन येतं. पायलट, मेंटेनन्स, विमानाची वैधता या सगळ्यावर त्यांचं नियंत्रण असतं. मग अशा प्रकारचा अपघात कसा होतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बारामती विमानतळावर रडार, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि पुरेशी यंत्रणा नसल्याची माहिती समोर येत असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “जर हे खरं असेल तर हा गंभीर प्रकार आहे. अजित पवारांपासून शरद पवार, गौतम अदानी यांच्यासारखी महत्त्वाची माणसं या विमानतळावर उतरतात. मग सुरक्षेची जबाबदारी कोणाची?” या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.

आरोप मागे घ्या – खरी श्रद्धांजली

भाजपने अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पानभर जाहिराती दिल्याबद्दल राऊत म्हणाले की, श्रद्धांजली देणं चांगली बाब आहे. मात्र, “याच भाजपने अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आज जर दादांवर खरंच प्रेम असेल, तर ते आरोप मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी मागणी त्यांनी केली. “केवळ जयंत्या साजऱ्या करू नका, जाहिराती देऊ नका. जे आरोप खोटे होते, ते विनाअट मागे घ्या,” असे सांगत राऊत म्हणाले की, “आज त्यांनाच उत्कृष्ट प्रशासक म्हणणारेच काल घोटाळ्याचे आरोप करत होते. हे दुटप्पीपण बंद व्हायला हवं.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com