Iran On Donald Trump Ceasefire Announcement : ट्रम्प यांच्या युद्धविराम घोषणेनंतर इराणची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले, "कोणताही करार झालेला नाही..."
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यानंतर शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर आता इराणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायलमधील संघर्ष थांबला आहे की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
शस्त्रसंधीच्या घोषणेवर काय म्हणाले इराणचे परराष्ट्र मंत्री ?
"इराणने वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे इस्रायलने इराणवर युद्ध सुरू केले, दुसऱ्या मार्गाने नाही. सध्या तरी, कोणत्याही युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. तथापि, जर इस्रायली राजवटीने तेहरा वेळेनुसार पहाटे 4 वाजेपर्यंत इराणी लोकांविरुद्ध बेकायदेशीर आक्रमण थांबवले तर, त्यानंतर आमचा प्रतिसाद सुरू ठेवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आमच्या लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल".
यापूर्वी, जेव्हा ट्रम्प म्हणाले की इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली आहे, तेव्हा तेहरानने हा दावा फेटाळून लावला. इराणने म्हटले आहे की त्यांना अमेरिकेकडून युद्धबंदीचा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही, जो युद्धबंदीची चर्चा करतो. तथापि, इस्रायलने अमेरिकेच्या दाव्यावर मौन बाळगले आहे.
काय म्हणाले होते ट्रम्प ?
इराणने दोहाजवळील अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर युद्धबंदीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, 24 तासांच्या कालावधीत युद्धबंदी लागू केली जाईल. त्यांनी लिहिले, 'सर्वांचे अभिनंदन. इस्रायल आणि इराणमध्ये 12 तासांसाठी पूर्ण आणि संपूर्ण युद्धबंदी असेल असा पूर्ण करार झाला आहे. 6 तासांनंतर युद्ध संपल्याचे मानले जाईल. अधिकृतपणे इराण युद्धविराम सुरू करेल आणि 12 व्या तासाला इस्रायल युद्धविराम सुरू करेल आणि 24 व्या तासाला 12 दिवसांचे युद्ध अधिकृतपणे संपेल.