Rahul Gandhi : मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींचा जीव धोक्यात?, पुणे न्यायालयात दावा
मतचोरीच्या आरोपांच्या वादळात गुरफटलेल्या काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात एक खळबळजनक दावा नोंदवला. “लोकसभा 2024 निवडणुकीतील मतचोरीचा मुद्दा मांडल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे,” असे त्यांच्या वकिलांमार्फत लेखी स्वरूपात सांगण्यात आले.
ही बाब सावरकर बदनामी प्रकरणातील सुनावणीदरम्यान समोर आली. सत्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या या खटल्यात राहुल गांधींचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी लेखी निवेदन सादर करून भाजप नेत्यांकडून मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला. त्यानुसार, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी “राहुल गांधींनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे जे झाले, तेच त्यांचे होईल” अशी धमकी दिल्याचा आणि दुसऱ्या एका नेत्याने त्यांना ‘दहशतवादी’ म्हटल्याचा आरोप करण्यात आला.
वकिलांच्या मते, सत्यकी सावरकरांचे ‘गोडसे घराण्याशी’ संबंध, सध्याचे तणावपूर्ण राजकीय वातावरण आणि हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या जहालमतवादींची वाढती सक्रियता हे घटक राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात.
दरम्यान, राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये बोगस मतदान व मतचोरी झाल्याचे आरोप केले होते. त्यांनी भाजप व निवडणूक आयोगावर थेट आरोप करत पुरावे सादर केले. यावर निवडणूक आयोगाने त्यांना स्वाक्षरी केलेले शपथपत्र सादर करण्याचा सल्ला दिला. मात्र, “ही माहिती माझी नसून निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवर आधारित आहे, मग मी शपथपत्र का सादर करू?” असा प्रतिप्रश्न राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींचा हा जीवाला धोका असल्याचा दावा आणि मतचोरीवरील आक्रमक भूमिकेमुळे खटल्याला नव्या संवेदनशील वळण आले असून, पुढील सुनावणीपर्यंत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.