Sanjay Raut : देशातल्या तपास यंत्रणा लाचार,तपास यंत्रणांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : देशातल्या तपास यंत्रणा लाचार,तपास यंत्रणांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताविषयीचा संशय अजूनही कायम असून या प्रकरणाने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताविषयीचा संशय अजूनही कायम असून या प्रकरणाने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. आमदार रोहित पवार यांनी मागील दोन दिवसांत विविध मुद्दे उपस्थित करत हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. त्यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

याच धाग्यावर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील तसेच देशातील तपास यंत्रणा निष्पक्षपणे काम करत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवरही गंभीर टीका केली. “ईडी, सीबीआय, राज्य पोलीस किंवा इतर यंत्रणांवर जनतेचा विश्वास उरलेला नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक घटनांचा तपास पक्षपाती पद्धतीने झाला,” असा दावा राऊत यांनी केला.

राऊत यांनी अहमदाबाद विमान अपघाताचा संदर्भ देत, त्या प्रकरणातील तपासाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला. अजितदादांना घेऊन येणारे विमान गुजरातमधून आले होते, यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी म्हटले. “तपास यंत्रणांवर आंधळा विश्वास ठेवू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.

रोहित पवार यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमधील मुद्द्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन चर्चा करावी, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवावे, असेही राऊत यांनी सुचवले. “हेच निष्पक्षतेचे लक्षण ठरेल,” असे ते म्हणाले. अन्यथा सरकारचे दुःखही ढोंगी असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत अपघाताविषयी चर्चा झाली असती तर तपासाला अधिक गती मिळाली असती, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. एकूणच, अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून सत्य बाहेर येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com