ISRO News : इस्रोच्या 'बाहुबली'चं प्रक्षेपण; कसं आहे LVM-3 जाणून घ्या
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. रविवारी सायंकाळी ५.२६ वाजता इस्रोने भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक GSAT-7R कम्युनिकेशन सॅटेलाइट यशस्वीपणे अवकाशात पाठवला. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून करण्यात आले.
हा उपग्रह भारतीय नौदलाच्या समुद्री सुरक्षा, देखरेख आणि नेटवर्किंग क्षमतांना नवे बळ देणार आहे. GSAT-7R हा पूर्णपणे भारतात बनवलेला उपग्रह असून, याचे वजन तब्बल ४,४०० किलोग्रॅम आहे. त्यामुळे तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात जड कम्युनिकेशन सॅटेलाइट ठरला आहे. या उपग्रहामुळे नौदलाच्या जहाजे, पाणबुड्या, विमानं आणि ऑपरेशन सेंटर्स यांच्यातील संवाद अधिक वेगवान, सुरक्षित आणि अचूक होणार आहे.
या प्रक्षेपणासाठी इस्रोने आपल्या सर्वात शक्तिशाली LVM-3 रॉकेटचा (बाहुबली रॉकेट) वापर केला. ह्याच रॉकेटने 2023 मध्ये भारताला अभिमान वाटावा असा चांद्रयान-3 चा मोहिमेचा यशस्वी प्रक्षेपण केले होते. एलव्हीएम-3 रॉकेटची खासियत म्हणजे ते ४,००० किलोपर्यंतचा उपग्रह जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये आणि सुमारे ८,००० किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) पोहोचवण्याची क्षमता राखते.
GSAT-7R च्या माध्यमातून हिंद महासागर क्षेत्रातील सिग्नल कव्हरेज आणि डेटा ट्रान्सफर क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या सॅटेलाइटमुळे नौदलाला दूरवरच्या ऑपरेशन्सदरम्यानही अखंड आणि सुरक्षित संवाद साधता येईल. याशिवाय, समुद्री हालचालींवर अधिक अचूक नजर ठेवणे, दहशतवाद आणि समुद्री चाचेगिरीसारख्या धोक्यांवर तत्काळ कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, GSAT-7R मिशन हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पात वापरलेले सर्व घटक आणि तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहेत. यामुळे भारताने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले तांत्रिक कौशल्य आणि अंतराळ संशोधनातील क्षमता सिद्ध केली आहे.
या यशानंतर संरक्षण क्षेत्रातील भारताची शक्ती अधिक वाढणार असून, देशाच्या समुद्री सीमांचे संरक्षण अधिक सक्षम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करत म्हटले की, “GSAT-7R हे मिशन भारताच्या सुरक्षेला आणि आत्मनिर्भरतेला अधिक बळ देणारे ठरेल.” या प्रक्षेपणासह इस्रोने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारत केवळ अवकाश मोहिमांमध्येच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यातही आघाडीवर आहे.

