Gaganyaan Mission : इस्रोची 'ड्रोग पॅराशूट'ची चाचणी यशस्वी; अवकाशवीर पृथ्वीवर सुरक्षित उतरणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) ने गगनयान मोहिमेतील महत्त्वाची कामगिरी यशस्वी करत क्रू मॉड्यूलचा वेग कमी करणाऱ्या ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या १८ आणि १९ डिसेंबर रोजी चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) च्या युनिटमध्ये पार पडल्या.
गगनयान मोहिमेत अवकाशवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी विशेष पॅराशूट प्रणाली वापरण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी एकूण चार प्रकारचे तब्बल १० पॅराशूट विकसित करण्यात आले आहेत. यातील ड्रोग पॅराशूट यानाचा वेग टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतात.
इस्रोच्या माहितीनुसार, क्रू मॉड्यूलचा वेग कमी करण्याची प्रक्रिया पॅराशूट चेंबरवरील संरक्षक कव्हर काढण्यापासून सुरू होते. त्यानंतर दोन ड्रोग पॅराशूट सक्रिय केले जातात. पुढे तीन पायलट पॅराशूट उघडले जातात, जे मुख्य पॅराशूट उघडण्यास मदत करतात. अखेरीस मुख्य पॅराशूट यानाची गती मोठ्या प्रमाणात कमी करून क्रू मॉड्यूलचे सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करतात.
या चाचण्यांमुळे विविध उड्डाण परिस्थितींमध्ये ड्रोग पॅराशूटची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली असून, भारताच्या मानवी अंतराळ प्रवासासाठी ही एक ऐतिहासिक आणि निर्णायक पायरी मानली जात आहे. इस्रोने या यशाबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर शेअर केली आहे.
