ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ
थोडक्यात
करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ
करदात्यांना दिलासा देत अंतिम मुदत एक दिवस वाढवून 16 सप्टेंबर 2025 केली
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने देण्यात आली मुदतवाढ
( ITR Filing Extension ) करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लाखो करदात्यांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सरकारने करदात्यांना दिलासा देत अंतिम मुदत एक दिवस वाढवून 16 सप्टेंबर 2025 केली आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल 7.3 कोटी आयटीआर दाखल झाले असून हा आकडा गेल्या वर्षीच्या 7.28 कोटींच्या तुलनेत जास्त आहे. यामुळे करदात्यांमध्ये वाढलेली अनुपालनाची प्रवृत्ती आणि कर बेस विस्तार स्पष्टपणे दिसून येतो. मात्र, अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर तक्रार केली होती की पोर्टलवर लॉग-इन करणे, आयटीआर अपलोड करणे, आगाऊ कर भरणे किंवा AIS डाउनलोड करणे यात अडथळे येत होते.
या संदर्भात विभागाने स्पष्ट केले की पोर्टल योग्यरित्या कार्यरत आहे आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी ब्राउझर कॅशे क्लिअर करावा किंवा पर्यायी ब्राउझर वापरावा. तसेच, करदात्यांना सुलभता मिळावी म्हणून विभागाने ईमेल आणि मोबाइल नंबरद्वारे समस्या नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
CBDT ने सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा म्हणून अंतिम मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आयटीआर दाखल केलेले नाही, त्यांनी ही संधी साधून विलंब न करता फाइलिंग पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.