Ravindra Dhangekar : पुणेकर जिंकले, मोहोळ हरले...? रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
जैन बोर्डिंगच्या वादग्रस्त व्यवहारावर अखेर तोडगा निघाला आहे. गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने या व्यवहारातून माघार घेतल्याचं पत्र जैन बोर्डिंगला पाठवलं आहे. या घडामोडीनंतर लोकशाही मराठी या वृत्तवाहिनी सोबत संवाद साधतांना आंदोलनाचे नेतृत्व करणारे रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं की, “व्यवहार रद्द झाला असला तरी संघर्ष अद्याप संपलेला नाही. जोपर्यंत संपूर्ण कागदपत्रांची नोंद (रजिस्टर डॉक्युमेंट) पूर्ण होत नाही आणि जागा समाजाला सन्मानाने परत मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील.”
धंगेकर म्हणाले, “हा लढा पुणेकरांचा आहे. पुणेकर कधीच हार मानत नाहीत. गोखले कन्स्ट्रक्शनने माघार घेतली, म्हणजे पहिला अंक संपला, आता दुसरा अंक सुरू होणार आहे.” या प्रकरणात एकनाथ शिंदे यांनीही हस्तक्षेप केला असून त्यांनी धंगेकरांना दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. “शिंदे साहेबांनी मला सांगितलं की दोन दिवस थांबा, मी तोडगा काढतो. त्यामुळे मी सध्या कोणावरही टीका करणार नाही, पण दोन दिवसांनी समाधान न झाल्यास पुन्हा बोलणार,” असं दंगेकर म्हणाले.
मुरलीधर मोहोळ यांच्याशी असलेल्या मतभेदांबद्दल धंगेकरांनी स्पष्ट केलं की, “माझा त्यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. माझा लढा हा विकृतीविरोधात आहे. कोण चुकीचं वागत असेल, तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार मी बोलणारच. आपण देव, देश आणि धर्मासाठी काम करतो. कुणीही किती मोठा असला तरी अन्याय होणार नाही. पुणेकरांनी या आंदोलनात साथ दिली, त्यामुळेच हा निर्णय झाला.” गोखले कन्स्ट्रक्शनच्या माघारीनंतर जैन बोर्डिंगचा वाद तात्पुरता मिटला असला तरी दंगेकरांनी स्पष्ट केलं की अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहणार आहे.

