Jain Boarding Meeting : जैन बोर्डिंग प्रकरणी आज बैठक; राजू शेट्टींच्या अध्यक्षेत पार पडणार बैठक
जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाला तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून देशभरातील विविध जैन धर्मीय संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून जैन समाजाने पुण्यातील या जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीला तीव्र विरोध दर्शवला आहे. या बोर्डिंगची जागा बिल्डरला विकण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला असून हा व्यवहार रद्द करावा, तसेच बोर्डिंगमधील जैन मंदिर कायमस्वरूपी ठेवावे, अशी त्यांची मागणी आहे.
शनिवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगमध्ये जाऊन तिथल्या जैन मुलींची भेट घेतली आणि परिस्थितीची माहिती घेतली. या भेटीत त्यांनी जैन समाजाच्या भावना जाणून घेतल्या तसेच "जैन समाजाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाईल" असे आश्वासन दिले.
ज्यांनी ही जागा विकत घेतली आहे ते बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे जवळचे मित्र असल्याने, या संपूर्ण प्रकरणात त्यांचा प्रभाव असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. त्यामुळे मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे व्यवहार रद्द होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विविध जैन संघटनांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील धोरण, आंदोलनाची दिशा आणि शासनाशी संवाद यावर चर्चा होणार आहे. जैन समाजाने यापूर्वीच इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर १ नोव्हेंबरपासून जैन मुनी अन्नत्याग आंदोलन सुरू करतील.
या आंदोलनाला अजूनही पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट दिलेली नाही. जैन मुनींनी त्यांना आंदोलनस्थळी येऊन संवाद साधण्याचे आवाहन केले असतानाही अजित पवारांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतल्यावर आता "पालकमंत्री अजित पवार जैन बांधवांना कधी भेटणार?" असा सवाल समाजातून उपस्थित केला जात आहे.
आजच्या बैठकीकडे संपूर्ण जैन समाजासह पुण्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत जर कोणताही ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समाजाचे नेते आणि मुनी आजच्या बैठकीत पुढील मार्ग निश्चित करतील अशी अपेक्षा आहे.

