Jayant Patil : जयंत पाटलांकडून आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी
नगरपालिकांसाठी घेण्यात आलेल्या एकाच निवडणूक (Election) प्रक्रियेतील निकालाच्या दोन तारखांवरुन वाद झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे, राज्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची तारीख नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर 21 डिसेंबर करण्यात आली आहे. मात्र, सांगली (Sangli) जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर मोठ्या संख्यने मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले असून झालेलं मतदान आणि निवडणूक आयोगाच्या यादीवरील नोंदीत तफावत असल्याचं सर्वांचं म्हणणं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील (Jayant patil) यांनी या घटनेनंतर आष्टा येथे जाऊन स्ट्राँग रुमची पाहणी केली.
कोर्टाच्या निर्णयामुळे तब्बल 18 दिवस ईव्हीएम (EVM) मतदान पेट्या सांभाळून ठेवणे, तेथील सुरक्षा व्यवस्थाचा चोख बंदोबस्त करणे हे जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोग आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. त्यातच, सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर मोठ्या संख्यने कार्यकर्ते जमले होते. काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये पोहोचले असून त्यांनी ईव्हीएम आणि मतदान आकडेवारी संदर्भात आढावा घेतला. यावेळी, आष्टा येथील मतदान प्रक्रियेनंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत, त्या स्ट्राँग रुममध्ये जाऊन पाटील यांनी पाहणी करत सुरक्षेसंदर्भात माहिती घेतली.
स्ट्राँग रुमबाहेर एलसीडीद्वारे प्रक्षेपण करावे
महाराष्ट्रातील सर्वच मतदान केंद्र आणि ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी कॅमेरे लावावेत. तसेच, रुमच्या बाहेर एक मोठा डिस्प्ले एलसीडीच्या माध्यमातून उभारण्यात यावा, तो जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जयंत पाटील दाखल झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस आणि सुरक्षा जवानांनी जमावाला बाहेरच रोखले, गेट लावून त्यांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यामुळे, नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
काय आहे प्रकरण
आष्टा नगर परिषदेमध्ये आमदार जयंत पाटील, वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली ज्याचे विशाल शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, तर अजित पवार राष्ट्रवादी-महायुतीकडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. निवडणूक प्रशासनाकडून आष्टा नगर परिषदेत रात्री देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये झालेले मतदान 22,864 इतके होते. मात्र, ऑनलाइन अपलोड झालेले 24,913 इतके मतदान होते. आष्टा शहर विकास आघाडीकडून एकूण 2 हजार 49 मतदान वाढल्याचा आरोप करण्यात आला आणि स्ट्रॉंग रुम बाहेर पदाधिकारी जमा झाले. शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना, अपक्ष उमेदवार स्ट्रॉंग रुम बाहेरमतदान वाढल्याचा आक्षेप घेत जमा झाले होते.
