Justin Trudeau Resignation: कॅनडामध्ये मोठी राजकीय उलथापालथ, जस्टिन ट्रुडो यांनी दिला राजीनामा
कॅनडामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचा देखील राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. नवीन पंतप्रधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.
आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनिता आनंद, पियरे पॉलीव्रे, क्रिस्टिया फ्रीलँड आणि मार्क कार्नी यांसारखी प्रमुख नावे पुढे येत आहेत. यापैकी भारतीय वंशाच्या नेत्या अनिता आनंद त्यांच्या प्रभावी कारभारामुळे आणि सार्वजनिक सेवेच्या चांगल्या रेकॉर्डमुळे प्रबळ दावेदार मानल्या जातात.
अनिता आनंद या कॅनडाच्या पंतप्रधान झाल्या, तर जस्टिन ट्रूडो यांच्या काळात कॅनडा आणि भारत यांच्यात बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान, कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या कारणास्तव भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले संकेत देऊ शकते.
याआधी जस्टिन ट्रूडो यांच्या कारकिर्दीत भारतावर हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा खोटा आरोप करण्यात आला, निज्जर हा भारताच्या दृष्टीने खलिस्तानवादी अतिरेकी असून, त्याच्या प्रत्यार्पणाची भारताची जुनी मागणी आहे. तो आणि त्याच्यासारख्या अनेक खलिस्तानवाद्यांच्या, पण ट्रुडो यांच्या दृष्टीने कॅनेडियन नागरिक असलेल्या अनेकांच्या हत्या करण्याचा कट भारताने रचला आहे, असा आरोप ट्रुडो यांनी नंतरही अनेकदा केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. कॅनडाच्या सरकारने या संदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. याचा परिणाम असा झाला की, पक्षातील इतर नेत्यांशी जस्टिन ट्रुडोचे संबंध बिघडले. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल. याचपार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.