Kalyan Shilpata Road: कल्याणशिळफाटा रस्ता पाच दिवस बंद, निळजे रेल्वे उड्डाणपुलासाठी विशेष ‘ब्लॉक’
कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनजवळ निळजे रेल्वे उड्डाणपुलाचे काम ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातची अधिसूचना शुक्रवारी प्रसिध्द केली जाणार आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपिरिया मॉलजवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाखालून जाणार आहे.
पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. शिळफाटा रस्त्यावरील सततच्या वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे:
● कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा.
● शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने जावे.
● बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहनांनी काटई नाका येथे न येता खोणी गावात वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे.
● हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे.