"ही माझी शेवटची.." निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या 'या' उमेदवाराने केलं मोठे विधान
Sandesh Parkar Emotional Appeal : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ठाकरे गटाचे उमेदवार आणि शहर विकास आघाडीचे प्रमुख शिलेदार संदेश पारकर यांनी भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. ही माझी नगरपंचायतीची शेवटची निवडणूक असून मतदारांनी मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी कणकवलीकरांना केले.
निकालापूर्वी प्रतिक्रिया देताना संदेश पारकर भावूक झाले. कणकवली शहराचे राजकीय व सामाजिक महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हे मतदान केवळ आकडेवारी नसून शहरातील परिवर्तनासाठी उचललेले पाऊल आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा नारा आम्ही दिला होता, त्याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कणकवलीतील कथित भ्रष्ट टोळीला सत्तेबाहेर काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आपली राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून एकत्र आले, असेही पारकर म्हणाले. या निवडणुकीत निलेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.
दुबार मतदार आणि बोगस मतदानासंदर्भात निलेश राणे यांनी केलेले आरोप वास्तव असल्याचे सांगत, सत्तेचा गैरवापर करून कशा पद्धतीने बोगस मतदान नोंदवले जाते, याची पोलखोल त्यांनी केल्याचा दावा पारकर यांनी केला. निलेश राणे यांनी कणकवलीचे पालकत्व स्वीकारावे, ही भूमिका आपली कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करताना संदेश पारकर म्हणाले, “जर खरोखरच विकास केला असेल, तर पैसे वाटण्याची गरज का पडली?” मला बदनाम करण्याचा आणि विकत घेण्याचाही प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. “तुमच्यात हिंमत असेल तर भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या, स्वयंभूच्या मंदिरात येऊन फुल उचला आणि सांगा की संदेश पारकर यांनी पैसे मागितले. तसे झाले तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतो, अन्यथा पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.
आपले निवडणूक चिन्ह असलेला ‘नारळ’ हा केवळ चिन्ह नसून शाश्वत विकासाचे श्रीफळ असल्याचे सांगत, जनतेचा कौल मिळाल्यास कणकवलीच्या विकासाचा शुभारंभ नारळ वाढवूनच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपते, निकाल काहीही असो तो लोकशाही मार्गाने स्वीकारू, तसेच जनतेच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.`
थोडक्यात
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ठाकरे गटाचे उमेदवार आणि शहर विकास आघाडीचे प्रमुख शिलेदार संदेश पारकर यांनी भूमिका मांडली आहे.
त्यांनी भावनिक आणि आक्रमक संदेश दिला आहे.
पारकर यांनी मतदारांना आवाहन केले की ही त्यांची नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे.
त्यांनी एकदा संधी देण्याची विनंती कणकवलीकरांना केली आहे

