Eknath Khadse vs Girish Mahajan : खडसे–महाजन आमनेसामने; आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी राज्यातील राजकारण तापले
भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकारण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच शब्दयुद्ध रंगलेली दिसत आहे.
अलीकडेच एकनाथ खडसे यांनी, “गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलेलो नाही. महाजन किती वाया गेले हे सर्वांना माहिती आहे,” असा टोला लगावत महाजनांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध ठिकाणी महाजनांनी “संबंध” ठेवले असल्याची टीकाही त्यांनी केली.
या टीकेला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजनांनी थेट प्रहार केला. महाजन म्हणाले,
“मी वाया गेलेलो आहे असे ते म्हणतात, पण त्यांना स्वतःचे पक्षच कळत नाही. भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका. मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा वागतो का?” महाजनांनी पुढे खडसेंच्या वारंवार बदलणाऱ्या पक्षनिष्ठेवरही निशाणा साधला. “लोकसभा आली की सुनेला कमळावर उभं करतात, विधानसभा आली की तुतारी वाजवतात. भुसावळला गेले की घड्याळ, तर कुठे मशाल. त्यांचा खरा पक्ष कोणता? चिन्ह कोणते? हे त्यांनाही समजत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
याचबरोबर खडसेंच्या कुटुंबातील वेगवेगळ्या पक्षांत असलेल्या सदस्यांवरही महाजनांनी टीका केली.
“चार सदस्य चार पक्षात. ताई आमच्या पक्षात खासदार, मंत्री आहेत. पण खडसे का येतात? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना,” असे महाजन म्हणाले. महाजनांनी थेट मानसिक अस्वस्थता आणि वयोमान यांचा उल्लेख करत खडसेंच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “माणूस इतका कसा लाचार होऊ शकतो? राजकारणात अशी उदाहरणे क्वचित दिसतात,” असे म्हणत त्यांनी खडसेंवर जोरदार हल्ला चढवला.
या शब्दयुद्धामुळे खडसे–महाजन विवाद पुन्हा एकदा चांगलाच चिघळला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय जुगलबंदी अजून तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
थोडक्यात
भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकारण तापले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच शब्दयुद्ध रंगलेली दिसत आहे.
अलीकडेच एकनाथ खडसे यांनी, “गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलेलो नाही. महाजन किती वाया गेले हे सर्वांना माहिती आहे.

