Operation Sindoor : पाकिस्तानवरील Air Strike ची माहिती देणाऱ्या 'त्या' महिला अधिकारी कोण, जाणून घ्या...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 26 जणांचा जीव घेतला. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटू लागल्या. अखेर 6 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हवाई हल्ला (Air Strike) केला. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असं या मिशनला नाव देण्यात आलं. या हवाई हल्ल्याची माहिती भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत दिली. ही माहिती देण्याची जबाबदारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांना सोपवण्यात आली. जाणून घेऊया, कोण आहेत या दोन डॅशिंग अधिकारी...
कर्नल सोफिया कुरैशी (karnal sofia qureshi) या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या आहेत. या युनिटला सशस्त्र दलांचा संपर्क कणा म्हणून ओळखले जाते. तर विंग कमांडर व्योमिका सिंग (wing commander vyomika singh) या हेलिकॉप्टर पायलट आहेत, ज्यांनी इंग्रजीमध्ये ब्रीफिंग दिले. या ब्रीफिंगसाठी सशस्त्र दलाच्या प्रवक्त्या म्हणून दोन महिलांची निवड करणे, भारताने अत्यंत काळजीपूर्वक संदेश देण्याचा एक भाग असल्याचे दिसते.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांची 2004 मध्ये भारतीय सैन्यात नियुक्ती करण्यात आली. तर डिसेंबर 2017 मध्ये त्या विंग कमांडर झाल्या. त्यांना चित्ता आणि चेतक उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांनी 2500 हून अधिक तास उड्डाण केले आहे.
2016 मध्ये कर्नल सोफिया कुरैशी देखील प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. बहुराष्ट्रीय लष्करी सरावात नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या. सहभागी झालेल्या 18 राष्ट्रांमध्ये कुरैशी या एकमेव महिला होत्या, ज्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या.