Maharashtra Municipal Election Commission PC Pointer
Maharashtra Municipal Election Commission PC Pointer Maharashtra Municipal Election Commission PC Pointer

Maharashtra Municipal Election Commission PC : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमधील प्रमुख 10 मुद्दे जाणून घ्या...

सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वार्ड पद्धत असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागेल.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Maharashtra Municipal Election Commission PC Pointer : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मुदत संपलेल्या 27 महापालिका तसेच नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी आणि जालना महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण 2069 नगरसेवक निवडले जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वार्ड पद्धत असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागेल. मात्र इतर महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत असल्यामुळे मतदारांना तीन ते पाच मते देता येणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

  • राज्यभरात सुमारे 3.48 कोटी मतदार असून त्यांच्यासाठी 39,147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत एकट्या 10,111 मतदान केंद्रे असतील. यासाठी मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम यंत्रणा वापरली जाणार आहे.

  • 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी केंद्र निवडणूक आयोगाकडून घेतल्यामुळे त्यात बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही.

  • दुबार नावे असलेल्या मतदारांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्या नावापुढे दोन तारे चिन्ह दिले जाणार आहे. अशा मतदारांच्या घरी भेट देऊन तपासणी करण्यात आली असून त्यांनी मतदान कुठे करणार याचे लेखी निवेदन घेतले आहे.

  • मुंबईत सुमारे 11 लाख संभाव्य दुबार मतदार आढळले असून हे प्रमाण सुमारे 7 टक्के आहे. ज्यांचा सर्वे झाला नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतले जाईल.

  • मुंबईसाठी सुमारे 290 निवडणूक अधिकारी तर संपूर्ण राज्यासाठी 870 अधिकारी नेमण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी जवळपास 1.96 लाख कर्मचारी काम पाहणार आहेत. मतदानाच्या 48 तास आधी प्रचार आणि जाहिरातींवर बंदी राहील.

  • राज्यातील 29 महापालिकांमधील एकूण 2869 जागांसाठी निवडणूक होत असून त्यामध्ये महिलांसाठी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित जागांचा समावेश आहे.

  • नागपूर, चंद्रपूर यांसारख्या काही महापालिकांमध्ये आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी निवडणुका तात्काळ घेण्यात येणार आहेत.

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबतही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 50 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्यात येणार आहेत.

  • राजकीय पक्षांना प्रचारासाठी केवळ 29 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेली सविस्तर माहिती

15 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार

  • मतदानः 15 जानेवारी 2026

  • मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026

  • उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतः 23 ते 30 डिसेंबर 2025

  • अर्ज तपासणी: 31 डिसेंबर 2025

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 2 जानेवारी 2026

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com