Ladki Bhahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला; महिलांची प्रतीक्षा वाढली, ₹३००० कधी जमा होणार?

Ladki Bhahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला; महिलांची प्रतीक्षा वाढली, ₹३००० कधी जमा होणार?

राज्यातील हजारो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली Ladki Bahin Yojana सध्या चर्चेत आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील हजारो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली Ladki Bahin Yojana सध्या चर्चेत आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिना संपायला अवघे दहा दिवस शिल्लक असताना खात्यात पैसे न आल्यामुळे “हप्ता नेमका कधी मिळणार?” हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र?

सुरुवातीला जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात रक्कम जमा झालेली नाही. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट ₹३००० जमा होऊ शकतात. काही सूत्रांनुसार हा हप्ता मार्च महिन्यात, विशेषतः होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दिला जाऊ शकतो. यंदा २ आणि ३ मार्च रोजी होळी साजरी होत असल्याने त्या कालावधीत पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

काही महिलांना मिळणार ₹६०००?

दरम्यान, केवायसी प्रक्रियेत त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. संबंधित महिलांनी केवायसी अपडेट केल्यानंतर त्यांच्या खात्यात प्रलंबित हप्ते एकत्र जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काही लाभार्थींना तब्बल ₹६००० पर्यंतची रक्कम मिळू शकते. म्हणजेच चार महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम मिळाल्यास अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल.

महिलांची वाढती उत्सुकता

लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या गरजांसाठी ही मदत महत्त्वाची ठरते. त्यामुळे हप्ता उशिरा मिळाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेक जणी बँक आणि संबंधित कार्यालयांमध्ये चौकशी करत आहेत.

एकंदरीत, जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये एकत्र जमा होण्याची शक्यता असली तरी अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांना आता लवकरच आनंदाची बातमी मिळेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com