Holi Special : होळी सणासाठी ‘लालपरी’ची कोकणाकडे धाव; १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन

Holi Special : होळी सणासाठी ‘लालपरी’ची कोकणाकडे धाव; १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन

कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या होळी आणि शिमगा सणासाठी यंदा एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या होळी आणि शिमगा सणासाठी यंदा एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत तब्बल १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ‘होळी जादा ऑपरेशन २०२६’ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड विभागांतून या विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

२७ फेब्रुवारीपासून ५ मार्चपर्यंत या जादा बस कोकणाच्या दिशेने धावणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने चाकरमानी आणि कुटुंबीय होळी सणासाठी गावी जाणार असल्याने एसटी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. विशेषतः २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत सर्वाधिक गर्दी अपेक्षित असून अनुक्रमे ९१ आणि ५९ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

विभागनिहाय फेऱ्यांचे नियोजन ठाणे विभागातून ७९ जादा फेऱ्या नियोजित करण्यात आल्या असून त्यापैकी ७१ फेऱ्या आगाऊ आरक्षणामुळे पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. मुंबई विभागातून ६२ फेऱ्या चालवण्यात येणार असून त्यापैकी ३७ फेऱ्या आरक्षणाने भरल्या आहेत, तर २५ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून चालवल्या जातील. रायगड विभागातून ३३ फेऱ्या आरक्षित प्रवाशांसाठी समर्पित असतील.

भाईंदर, ठाणे, पनवेलहून विशेष सेवा होळी आणि शिमगा सणानिमित्त १ ते १० मार्च या कालावधीत भाईंदर, ठाणे आणि पनवेल येथून कावळेगावकडे विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून प्रवाशांना सोयीस्कर पद्धतीने तिकीट बुक करता येणार आहे. भाईंदर ते कावळेगावसाठी Bydr To Kag, ठाणे सीबीएस ते कावळेगावसाठी Thncbs-Thane To Kag आणि पनवेल ते कावळेगावसाठी Pnl To Kag असे टाईप करून आरक्षण करता येईल. भारतीय विमा कर्मचारी सेना, मुंबई क्षेत्रीय कार्यालय ३ चे अध्यक्ष तसेच श्री देवी काळकाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे सरचिटणीस विनोद येरुणकर यांनी चाकरमान्यांना या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित, वेळेवर आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी एसटी हा विश्वासार्ह पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रवाशांसाठी सूचना

प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून गर्दी टाळावी, बसस्थानकावर वेळेत उपस्थित राहावे आणि प्रवासादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी आणि बसची व्यवस्था केली आहे. एकूणच, होळी सणासाठी ‘लालपरी’ची ही विशेष धाव कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. परंपरेप्रमाणे गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी एसटी महामंडळाचे हे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com